ज्येष्ठ गौरी आवाहन, पूजन ,विसर्जन,मुहूर्त, जाणून घ्या…

अध्यात्मिक

 

मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती बाप्पाचे आगमन होईल. सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी अनेक जण आतुर झालेले असतात. बाप्पाच्या आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचाही उत्साह महिलांमध्ये पाहायला मिळत आहे. याच गौरी पूजना संबंधीची माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

१० सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन होईल. यंदा मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल; तर बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल. तसेच गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल. गौरी आवाहन शुभ मुहूर्त हा ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त १० सप्टेंबर रोजी सूर्यदयापासून ते संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत आहे.

राहू काळ दुपारी ३ ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. अनुराधा नक्षत्र प्रारंभ ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून आहे. अनुराधा नक्षत्र समाप्ती १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत असेल. ज्येष्ठा गौरी आवाहनाचे महत्त्व म्हणजे या दिवशी गौरी म्हणजे देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीचे आवाहन केले जाते. गणराया प्रमाणेच गौरींचे देखील उत्साहत स्वागत होते.

यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते. बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात. त्यामध्ये शाडू, पितळे, कापडी, फायबरचे असे काही प्रकार पाहायला मिळतात. काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात; तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात. राज्यभरात गौराईच्या आगमनाची आणि पूजेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते.

तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रीतही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते. प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात. मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन, असेही म्हटले जाते. या दिवशी गौराईचा श्रृंगार केला जातो. तिला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जाईल. अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन, तसेच माहेरवाशीण देखील म्हटले जाते.

अशाप्रकारे गौरी पूजना संबंधीची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेतलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *