नमस्कार मित्रांनो,
2 एप्रिलला गुढीपाडवा येत आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचा सर्वात पहिला सण. याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानले जाते. यामुळे या दिवशी केलेले कोणतेही काम यशस्वी होते. म्हणूनच व्यापारी लोक या दिवशी दुकानाचे उद्घाटन करून आपल्या व्यवसायाची सुरुवात या दिवसापासून करतात.
काही व्यक्ती जमीन खरेदी करतात तर काही घर खरेदी करतात. सोन्याची खरेदीही या दिवशी शुभ समजली जाते. म्हणून स्त्रियांची या दिवशी सोन्याच्या दुकानात गर्दी दिसते. ज्यांना शक्य असेल ते वाहन खरेदी करतात. या दिवशी केलेले कोणतेही काम फायद्याचे ठरते.
या वर्षी गुढीपाडवा 2 एप्रिलला शनिवारी येत आहे. प्रतिभला तिथीची सुरुवात 1 एप्रिलला शुक्रवारी सकाळी 11:56 मिनीटांनी होणार असून प्रतिभला तिथीची समाप्ती गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे शनिवारी 2 एप्रिलला सकाळी 12:31 होणार आहे. गुढीपाडव्याचे पूजन कसे करावे व त्या दिवशी कोणते कार्य करावे हे ही पाहणार आहोत.
गुढीपाडव्याला सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर अंगणात सडा मारून रंगीत रांगोळी काढावी. त्यात छान असे रंग भरून ती रांगोळी सुशोभित करावी. दाराला आंब्याच्या पानाचे तोरण लावावे. नंतर वेळूची काठी घेऊन रेश्मी किंवा भरजरी साडी त्या काठीवर टाकावी. एक आंब्याची डहाळी व कडुलिंबाची डहाळी अडकवावी आणि त्यावर तांब्याचा कलश उलटा अडकवावा.
अशाप्रकारे आपली गुढी तयार होते. गुढीला साखरेची माळ, फुलांची माळ अर्पण करावी आणि ती गुढी दाराच्या बाहेर उंच बांधावी. गुढीला हळद कुंकू अर्पण करून तिचे पूजन करावे. गोडा धोडाचा नैवेद्य अर्पण करावा. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो.
गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. दुपारी 12 वाजायच्या आत गुढीला नैवेद्य अर्पण करून पूजन केले जाते व गुढी उतरवले जाते. या दिवशी सकाळी गुढीची पूजा झाली की, जेवणापूर्वी 2 ते 3 कडुलिंबाची पाने व थोडासा गुळ खावा. गुढीपाडवा ज्या काळात येतो तो काळ म्हणजे वसंत ऋतु चा काळा असतो.
वसंत ऋतुमध्ये झाडांना कोवळी कोवळी पालवी फुटलेली असते. कडुलिंबाची पाने आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात व ती कोवळी असल्याने कडूही लागत नाही. त्यासोबतच थोडासा गुळ खाल्याने कडू आणि गोड यांचे मिश्रण होते. म्हणजे वर्षभर कितीही वाईट घटना आपल्यासोबत घडल्या तरी आपण त्यांना गोड कसे करायचे हे आपल्याला जमते.
यासाठी वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांनी कडुलिंब व गुळ खायचा सल्ला दिला आहे. हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय.
हिंदूंच्या सण व उत्सवांमध्ये सर्वात पहिल्या सणाचा मान गुढीपाडव्याला जातो. या दिवशी सर्वजण एकमेकांना भेटून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि आनंदात व उत्साहात सर्वजण मिळून हा सण साजरा करतात आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.