शंकर महाराजांबद्दल ५ विचित्र गोष्टी

अध्यात्मिक माहिती

एका ठिकाणी तमाशा सुरू होता. तमाशा चिल्या बाळाचा वध हे वगनाट्य रंगात आलं होतं. त्या वगनाट्यात एक नवशिका कलाकार काम करत होता. तमाशातल्या शिवशंकराने त्या कलाकाराला आज्ञा केली की, समय जवळ आला आहे चल उडव ते चिले बाळाचं मुंडक, नवशिक्या कलाकारांने एका क्षणात हातातल्या तलवारीने खरोखरच चिल्या बाळाचे सोंग घेतलेल्या पोराचं मुंडक उडवलं आणि तो मुलगा जागीच ठार झाला. ते दृश्य पाहून सगळ्यांनी खून खून असा आरडाओरडा केला. पोलीस पाटलाला बोलवण्यात आले.

पोलीस पाटील पोलिसांना बोलवणार तेवढ्यात त्या नवशिक्या कलाकाराने मनातल्या मनात आपल्या गुरुचा धावा सुरू केला आणि पुढच्या क्षणी तो मुंडक उडवलेला मुलगा स्टेजवर जिवंत झाला. ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि तेव्हा लोकांना कळलं की तो नवशिका कलाकार म्हणजे कोणी साधारण व्यक्ती नाही.

तर मंडळी ज्यांच्याबद्दल ही आख्यायिका आजही लोकांमध्ये सांगितली जाते ते व्यक्ती होते धनकवडीचे प्रसिद्ध योगी ‘श्री शंकर महाराज’! आज आपण पाहणार आहोत की लोक शंकर महाराजांना एवढे का मानतात?: शंकर महाराजांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे वारसदार मानलं जातं. आणि स्वतः शंकर महाराज देखील आपण स्वामी समर्थांना गुरु मानतो असं लोकांना सांगायचे. शंकर महाराजांच्या जन्म आणि मृत्यू बद्दल अचूक पुरावे आढळून येत नाही.

पण अघोर शास्त्री यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रात मात्र शंकर महाराजांचा जन्म आणि मृत्यू हे दोन्ही 13 तारखेला झाल्याचे सांगण्यात येते. शंकर महाराजांचे मूळ गाव हे नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातलं अंतापुर. त्यांचा कार्यकाळ हा साधारण 1800 ते 1947 सालापर्यंत म्हणजे जवळपास दीडशे वर्षांचा होता. असं त्यांच्या भक्तांचे म्हणणे आहे. ते स्वतःला भगवान शंकराचा अवतार माणायचे आणि ते पटवून देताना लोकांना सांगायचे की “मै कैलास का रहनेवाला मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया कर ले कुछ अपना घर”.

शंकर महाराजांच्या जन्माबद्दल पण एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की त्यांच्या वडिलांना म्हणजेच चिमणाजींना बराच काळ मुल बाळ होत नव्हतं. चिमणाजी हे भगवान शंकराचे मोठे भक्त होते. एक दिवस भगवान शंकरांनी त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, उद्या रानात जा, तुला तिथे एक मुल मिळेल, त्या मुलाला घरी आण आणि त्याचा व्यवस्थित सांभाळ कर. त्यानुसार जेव्हा चिमनाजी दुसऱ्या दिवशी रानात गेले तेव्हा त्यांना खरोखरच एक मूल रडताना आढळले. त्या मुलाच्या बाजूला एक वाघ बसलेला होता.

चिमणाजींना पाहून तो वाघ तेथून निघून गेला आणि मग चिमणाजी त्या मुलाला घेऊन घरी आले. पुढे भगवान शंकराच्या नावावरून त्या मुलाचं नाव शंकर ठेवलं. लहानपणी या शंकर महाराजांचा स्वभाव हा अतिशय अस्थिर होता. त्यांचा एका जागी ठाव ठिकाणा नसायचा. सतत इकडून तिकडे भटकत राहायचे.

एका दिवशी एका अलौकिक शक्तीने स्वप्नात येऊन छोट्या शंकर महाराजांना अक्कलकोटची वाट धर असा संदेश दिला. त्या आदेशा नुसार मग आपल्या आई वडिलांना पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद देऊन शंकर महाराजांनी आपल राहतघर सोडला. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम केला. मिळेल ती काम करून गुजराण केली. वेळप्रसंगी तमाशात काम देखील केलं.

पण आधी सांगितल्या प्रमाणे चिल्या बाळाच्या वगनाट्य सादरीकरना दरम्यान ही अद्भुत घटना घडली आणि तिथून शंकर महाराजांचे जीवनच बदलले. त्यांना स्वप्नात आदेश देणाऱ्या अलौकिक शक्तीने म्हणजेच खुद्द स्वामी समर्थ महाराजांनी म्हणे त्या घटनेतून शंकर महाराजांना सुखरूप बाहेर काढलं. आणि दृष्टांत देऊन सांगितलं की, “आता इकडे तिकडे भटकून दिवस वाया घालवू नकोस. सरळ कैलासात जा आणि दिक्षा प्राप्त कर आणि लोक कल्याणाचा वसा हाती घे. कारण आमचा अवतार कार्य आता संपलेल आहे, इथून पुढे तुझ्याच खांद्यावर दत्त परंपरेची जबाबदारी असणार आहे.” हे ऐकून शंकर महाराज थेट कैलासात गेले. स्वामींच्या मार्गदर्शनात दीक्षा प्राप्त करून घेतली आणि ते लोक कल्याणासाठी देशभर भ्रमंती करायला लागले.

महाराजांबद्दलची अख्यायिका त्याचे भक्त मंडळी आज आवर्जून सांगतात. तेव्हा महाराजांना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने बोलावलं जायचं. सातपुडा भागात ते सुपड्याबाबा, खानदेशात कुरुवा स्वामी, वागोत मध्ये गौरीशंकर तर मध्य प्रदेशात लहरी बाबा या नावाने प्रसिध्द होते. थोर साहित्यिक आचार्य अत्रे, बालगंधर्व, पुण्यातील डेक्कन कॉलेजचे प्राचार्य भालचंद्र देव, डॉक्टर धनेश्वर, संजीवनी मेडिकलचे मालक परांजपे, महाराजा सयाजीराव गायकवाड असे कित्येक बड्या असामी शंकर महाराजांच्या भक्त होत्या.

खुद्द शंकर महाराजांनीच म्हणे सयाजीरावांना बडोद्याच्या गादीवर बसवलं होतं. एवढंच नाही तर जपान आणि रशिया सारख्या देशातील शंकर महाराजांना मानणारे लोक होते. महाराजांना जगातल्या बऱ्याच भाषा बोलता यायच्या. जो कोणी माणूस महाराजांच्या दर्शनाला यायचा महाराज त्याच्या मातृभाषेतच त्याच्याशी बोलायचे.

मग अगदी इंग्रजी, रशियन आणि जपानी भाषा सुद्धा! लोकांना त्या गोष्टीच खूप कौतुक वाटायचं. महाराजांना सिगारेट ओढण खूप आवडायचं. ते म्हणायचे “त्या सिगारेटच्या धूरात तरंगत मी त्रैलोक्यात फेरफटका मारून येतो.” त्यामुळे आजही सगळे लोक महाराजांच्या प्रतिमेसमोर आणि समाधी स्थळावर उदबत्तीचे ऐवजी सिगारेट पेटवून लावतात.

महाराजांनी संसारात रमणाऱ्या लोकांना, “आपल्या प्रश्नांची उत्तर आपणच शोधावीत” हे तत्त्वज्ञान सांगितलं. “पण हे करत असताना गुरुचा सल्ला जरूर घ्यावा” असाही त्यांनी आपल्या भक्तांना उपदेश केला. स्वामी समर्थांच्या शेवटच्या काळात शंकर महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा आणि गजानन महाराज अक्कलकोट मध्ये म्हणे एकत्र फिरायचे.

शंकर महाराजांनी आपल्या कार्यकाळात हिमालय, हैदराबाद, मध्य प्रदेश, अक्कलकोट, त्रंबकेश्वर, तुळजापूर, औदुंबर, पुणे, बेंगलोर अशा अनेक ठिकाणी वास्तव्य करून लोकांना ज्ञानाची प्राप्ती करून दिली. त्यांच्याबद्दल बऱ्याच अख्यायिका जनमानसात सांगितल्या जातात. त्यापैकी हैदराबादच्या निजामाला त्यांनी सांगितलेली त्यांच्या राज्यबुडीची घटना असो किंवा 1928 साली त्यांनी भारत पाकिस्तान वेगळे होणार असल्याची केलेली भविष्यावानी असो.

आज बघतानाही सगळं विश्वास ठेवण्यापलीकडे वाटतं. अगदी महाराजांनी स्वातंत्र्यानंतर कोणकोणत्या मोठ्या व्यक्तींना गोळ्या घालून मारण्यात येणार आहे याची भविष्यवाणी केली होती, असं सांगितलं जातं. शंकर महाराजांच्या या चमत्कारांसारखंच त्यांच्या वयाबाबतीतही गूढता आहे. कुणी म्हणतात ते 100 वर्ष जगले, तर कुणी म्हणतात ते 162 वर्ष जगले. एकदा पुण्याच्या धनेश्वर डॉक्टरांनी शंकर महाराजांना त्यांच्या वयाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की, “मी पेशवा सोबत पेशवेवाड्यात जेवण केले आहे त्यावरून तु माझ्या वयाचा अंदाज लावू शकतो.” पुढे जेव्हा त्या डॉक्टरांनी खरोखरच महाराजांचे वय चेक केले तेव्हा त्यांना विश्वासच बसेना, कारण टेस्ट रिपोर्ट नुसार शंकर महाराजांचं वय दीडशे वर्षे दाखवले गेले होते अशी आजही नोंद आहे.

कधी विष्णू अवतारात भक्तांना दर्शन देण असो किंवा खिरीत पडून मेलेल्या चिमणीला जीवदान देणं असो. या सगळ्या घटना शंकर महाराजांशी जोडल्या गेल्या आहेत आणि तेव्हापासून शंकर महाराज लोकांसाठी कर्मयोगी झाले ते कायमचेच. पुढे आपली इच्छित कार्य संपून शंकर महाराजांनी 26 एप्रिल 1947 साली पुणे सातारा रोडवर असणाऱ्या धनकवडी भागात समाधी घेतली. शंकर महाराजांची चमत्कार आणि त्यांची उपासना करण्याचे प्रकार खूपच निराळे होते.

त्यामुळेच की काय आज सुद्धा लाखो संख्येने लोक शंकर महाराजांच्या समाधी स्थळावर डोकं टेकवण्यासाठी जातात. तिथे चिलीम, दारू आणि सिगरेट वाहतात. महाराजांच्या भक्तांनी तर त्यांच्यावर गाणी देखील काढलेली आहेत. तेवढेच नाही तर त्यांच्या नावाने योग्य योगेश्वर जय शंकर नावाची मालिका सुद्धा कलर्स मराठी चैनल वर प्रदर्शित करण्यात आली आहे. भेदक डोळ्यानी बघत पाय मुडपून बसलेला त्यांचा फोटो आज कित्येक लोकांच्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवलेला दिसतो. त्यात प्रामुख्याने तरुणांची संख्या जास्त आहे हे विशेष. आता महाराजांबद्दलच्या या सगळ्या घटना, चमत्कार, अख्यायिकाच्या तक्त्यावरून वेळोवेळी अनेक वाद-विवाद देखील झालेत. चमत्कारांच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवली जाते असेही म्हटले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *